मराठा आरक्षणाचे मारेकरी समजले, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
उपोषण थांबविले,
चर्चेनंतर पुढील दिशा
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण, हे समोर आले आहे. आता मराठा समाजाचे डोळे उघडले असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आता यापुढे आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. उपोषणकर्त्यांशी चर्चा करून यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यकर्ते संतप्त झाले आणि चलो मुंबईचा नारा दिला.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. गेल्या ५ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या दरम्यान जरांगे यांची तब्येत खालावली. तरीही शासन स्तरावरून या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढे दिवस आंदोलन करावे लागेल, असे वाटले नव्हते, असे मनोज जरांगे म्हणाले. जरांगे पाटील यांनी शनिवार, दि. २५ जानेवारी पासून उपोषण सुरू केले होते. त्यांचे हे सातवे उपोषण होते. आम्ही गेले पावणे दोन वर्षे आंदोलन केली. मात्र आता वेगळ््या मार्गाने मी आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. त्यासाठी उद्या १२ वाजता समाजबांधवांसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावर होय पण म्हणत नाहीत आणि नाही पण म्हणत नाहीत. ते गप्प बसले आहेत. याचा अर्थ त्यांच्या मनात मराठ्यांविषयी किती द्वेष आहे हे कळले. आमच्यासोबत बेइमानी केली तर ५ वर्षे सरकार नीट चालू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता. मागण्यांचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटमही दिला होता. पण सरकारने त्यावर कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आता आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला.
देशमुख हत्येवरून लक्ष
हटू नये म्हणून माघार
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटू नये, यासाठी उपोषण मागे घेत असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.