नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतात तयार झालेली पहिली चिप मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली. वैष्णव यांनी विक्रम ३२-बिट प्रोसेसर आणि इतर मंजूर प्रकल्पातील टेस्ट चिपही सादर केल्या. सेमीकंडक्टर ही आजच्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य, दळणवळण, संवाद, संरक्षण आणि अंतराळ विज्ञानात या चिपचा सर्वाधिक वापर होतो. इतकेच नाही तर ऑटो क्षेत्रातही सेमीकंडक्टर चिपला महत्त्व आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात चिप इकोसिस्टिमवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या या साम्राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नाला भारताने जोरदार हादरा दिला आहे.
डिजिटल आणि ऑटोमेशन जसे झपाट्याने वाढत आहे, तसे आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी तशी सेमीकंडक्टर आवश्यक ठरत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याची शक्यता आहे. भारत अत्यंत वेगाने या दिशेने जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत सेमीकॉन इंडिया २०२५ चे उद्घाटन केले. २०२१ मध्ये १० सेमीकंडक्टर प्रोजेक्टससाठी सरकारने अगोदरच परवानगी दिली. त्यासाठी १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने चिप तयार करण्यास सुरुवात झाली. सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले. अवघ्या ३.५ वर्षात जगाचा भारतावरील विश्वास दिसून आला. आज देशात ५ सेमीकंडक्टर युनिट्सची निर्मिती अत्यंत वेगाने सुरू आहे. आता पंतप्रधान मोदी यांना पहिली मेड इन इंडिया चिप भेट देण्यात आल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
सेमीकंडक्टरमध्ये
भारताची मुसंडी
इस्त्रोच्या सेमीकंडक्टर लॅबने विक्रम प्रोसेसर तयार केले आहे. हा भारताचा पहिला स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर आहे. हा लाँचिंगदरम्यान अडचणीतही काम करू शकतो. २०२१ मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू झाले. ४ वर्षात भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह योजनेची घोषणा केली. यामध्ये जवळपास ६५ हजार कोटी रुपये अगोदरच देण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी गुजरातमधील साणंद येथे देशातील पहिली एंड टू एंड आऊटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेम्बल अँड टेस्ट पायलट लाईन सेवा सुरू केली. सीजी-सेमी या सेमीकंडक्टर कंपनीने पहिली मेड इन इंडिया चिप तयार करून दिली आहे.