नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात फास्टॅगच्या पासची किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खासगी वाहनचालकांना १ एप्रिल २०२६ पासून पाससाठी आधीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वार्षिक टोल पासची किंमत वाढविली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून वाहनचालकांना या पाससाठी ३ हजार रुपयांऐवजी ३०७५ रुपये द्यावे लागणार आहेत.
वार्षिक टोल पाससाठी नवीन दर २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी लागू असतील. हा पास फक्त खाजगी वाहनांसाठी आहे आणि त्यासाठी सक्रिय फास्टॅग आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणा-या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅगचा वार्षिक पास घेण्याची सुविधा सुरू केली होती. यामुळे टोल भरण्याच्या वेळेत बचत होऊन प्रवास अधिक जलद झाला. यापूर्वी या पासची किंमत ३ हजार रुपये होती. आता यामध्ये २.५ टक्क्यांची वाढ झाली असून प्रवाशांना ३,०७५ रुपयांत पास विकत घ्यावा लागणार आहे. हा पास केवळ खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असणार आहे.
३,०७५ रुपयांचा वार्षिक पास घेतल्यावर हा पास एका वर्षासाठी किंवा २०० वेळा टोलनाका ओलांडेपर्यंत वैध असेल. या दोन्हीपैकी जे आधी पूर्ण होईल, त्यानुसार पासची वैधता समाप्त होईल. जर प्रवासी एक वर्ष पूर्ण होण्याआधीच २०० वेळा टोल नाका ओलांडतील तर त्या पासची मुदत संपेल. प्रवासी वर्षभर कधीही पासचा रिचार्ज करू शकतात. १ एप्रिलपासून देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर हे नवीन दर लागू होणार आहेत. टोल दरांचा दरवर्षी आढावा आणि सुधारणा केली जाते. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, यावेळी वार्षिक पासच्या किमतीत थोडीशी वाढ करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार प्रवास करणा-या वाहनचालकांना वार्षिक टोल पास सहज मिळू शकतो. ही सुविधा एनएचएआयद्वारे प्रदान केली जाते आणि त्यांच्या वाहनात सक्रिय फास्टॅग आवश्यक आहे. वाहन मालक एनएचएआय पोर्टलवर किंवा त्यांचा फास्टॅग जारी करणा-या बँके/अॅपवर लॉग इन करून वार्षिक पाससाठी अर्ज करू शकतात.
५० लाखांहून अधिक
वाहनचालकांची पसंती
१५ ऑगस्टपासून सुरू केलेल्या या योजनेला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सध्या भारतातील ५० लाखांहून अधिक वाहनचालक टोल भरण्यासाठी वार्षिक पासची खरेदी करतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका ब-याच प्रवाशांना बसणार आहे. सध्या किरकोळ दरवाढीमुळे फारसा फरक पडणार नाही. राष्ट्रीय महामार्गावर खासगी वाहनांकडून घेतलेल्या टोलपैकी २८ टक्के व्यवहार फास्टॅगच्या वार्षिक पासद्वारे होतो.
१० वर्षांपूर्वी सुरू झाली सेवा
फास्टॅगची सेवा २०१६ म्हणजेच १० वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ११.८६ कोटी फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. यापैकी सध्या ५.९ कोटी फास्टॅग सध्या सक्रिय आहेत. दरवर्षी टोलच्या शुल्कामध्ये सुधारणा केली जाते. त्यानुसारच ही दरवाढ केली गेली आहे. जे प्रवासी मार्च महिन्यापर्यंत रिचार्ज करतील, त्यांना केवळ ३ हजार रुपये द्यावे लागतील, असे एका अधिका-याने सांगितले.

