दिशा सालियन मृत्यू प्रकरणी कोर्टाचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी दिवंगत मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सर्वांत आधी दिशा सालियन हिची आत्महत्या किंवा मृत्यू नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. यावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आदित्य ठाकरे यांना पकडून चौकशीची गरज का आहे, हे याचिकाकर्त्याने पटवून द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी २ आठवड्याची मुदत दिली आहे.
दिशा सालियन प्रकरणावरुन राशिद खान पठाण यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची मागणी याचिकेतून केली. आदित्य ठाकरे यांचे ८ जून २०२० चे लोकेशन तपासा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. यावर आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का आहे, हे पटवून द्या, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. त्यासाठी याचिकाकर्त्याला २ आठवड्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आता याचिकाकर्त्याला हे पटवून द्यावे लागणार आहे.