मुंबई : प्रतिनिधी
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानिटकर यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये काही वर्षांपासून दुरावा आल्याची चर्चा होतीच. आता त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट जाहीर केला आहे. लग्नानंतर १५ वर्षांनी दोघांचा संसार मोडला आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आदिनाथ आणि ऊर्मिलाने सोशल मीडियावर एकत्रित पोस्ट करुन घटस्फोट जाहीर केला आहे.
आपल्या पोस्ट मध्ये लिहिताना,
आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो,
खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजÞा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचे सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन करत आहोत.
आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील. गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे.
म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद.
१५ वर्षांचा संसार मोडला
आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानिटकर ‘शुभमंगल सावधान’ सिनेमाच्या सेटवर भेटले होते. तिथेच त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. आदिनाथचे वडील दिग्दर्शक महेश कोठारे यांनीच या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. २०११ साली दोघे लग्नबंधनात अडकले. ही जोडी प्रेक्षकांचीही आवडती जोडी होती. २०१७ साली ऊर्मिलाने मुलीला जन्म दिला. तिचे नाव जिजा असे ठेवण्यात आले. काही वर्षांनी मात्र आदिनाथ आणि ऊर्मिलामध्ये काही कारणामुळे बिनसलं. आज अखेर त्यांनी सोशल मीडियावर वेगळं होत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
















