24.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeलातूरआधार आधारित बायोमेट्रिक प्रणाली

आधार आधारित बायोमेट्रिक प्रणाली

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या उपस्थितीसाठी कांही महिण्यापूर्वी फेस रिडींग बायोमॅट्रिक प्रणाली सुरू करण्यात आली होती. या प्रणालीमध्ये बदल करत नाविण्यपूर्ण अशी एनआयसी आधार-आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीे कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे अधिकारी व कर्मचारी दररोज कार्यालयात येताना व जाताना मोबाईलद्वारे उपस्थितीची नोंद करताना दिसून येत आहेत.
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहूलकुमार मिना यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा परिषद येथे प्रशासनातील पारदर्शकता, शिस्त व कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने एनआयसी विकसित आधार-आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लोकेशन-आधारित फेस रेकग्निशन तंत्रज्ञानासह फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर प्रणालीअंतर्गत जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांतील जवळपास २५१ अधिकारी व कर्मचारी नोंदणीकृत असून ते दररोज मोबाईल-आधारित फेस अटेन्डन्स प्रणालीद्वारे येणे व जाणे उपस्थिती नोंदवत आहेत.
कार्यालय परिसरातच उपस्थितीची नोंद होणार
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्मचारीच्या आधार क्रमांकाशी संलग्न सुरक्षित नोंदणी होत असल्यामुळे बनावट, प्रतिनिधी उपस्थितीला आळा बसणार आहे. एनआयसीच्या सुरक्षित प्रमाणीकरण यंत्रणेशी एकत्रीकरण व अधिकृत कार्यालय परिसरातच उपस्थिती नोंदविण्याची सुविधा आहे. जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रिअल-टाईम चेहरा पडताळणी होणार आहे. फोटो किंवा अन्य माध्यमातून गैरवापरास प्रतिबंध बसणार आहे. मोबाईल ऍपद्वारे उपस्थिती नोंदणी व वेळ व स्थानासह डिजिटल नोंद होणार आहे. तसेच रिअल-टाईम डेटा सर्व्हरवर संकलित करण्यास मदत होणार आहे. विविध प्रकारच्या रजांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असून सक्षम प्राधिका-याद्वारे ऑनलाईन मंजुरी प्रक्रिया होण्यास मदत होणार आहे. जि. प. अधिकारी व कर्मचा-यांची विभागनिहाय उपस्थिती निरीक्षण बरोबरच दैनिक, साप्ताहिक व मासिक अहवालासाठी मदत होणार आहे. तसेच कर्मचारी उशिरा येणे व अनुपस्थिती यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून एमआयएस अहवाल डाउनलोडची सुविधा उपलब्ध आहे.
१०० मीटरच्या परिसरात उपस्थिती नोंदवता येणार 
लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या कार्यालयीन उपस्थितीसाठी फेस रिडींग प्रणाली बसवली होती. मात्र त्यातून प्रत्येक वेळी डाटा काढून पाहण्यासाठी आडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाच्या एनआयसी अधिकृत संस्थेच्या विकसित आधार आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली मोबाईलद्वारे सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या १०० मिटरच्या परिसरात अधिकारी व कर्मचारी मोबाईलद्वारे आपली उपस्थिती नोंदवू शकतात. एखाद्या अंगणवाडी व शाळेला भेट दिल्यानंतर ऑनलाईन फिल्ड व्हिजिटची नोंद करता येणार आहे. कर्मचा-यांच्या उपस्थितीचे ऑनलाईन मस्टर पाहता येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मिना यांनी
सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR