बार्शी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटीमध्ये मागील एक वर्षापासून ६ वे आमरण उपोषण सुरू आहे. त्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांचे आमरण उपोषणाचा देखील सातवा दिवस सुरू आहे.
असे असताना सरकार कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्यामुळे सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा यासाठी सरकारच्या नावानं घंटानांदोलन बार्शी तहसील कार्यालयासमोर सुरू आहे. जर मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं नाही आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या विधानसभेला सरकारला मत देण्याऐवजी मराठा समाज घंटा देईल, अशा प्रकारचा इशारा यावेळी उपोषणकर्ते आनंद काशीद यांनी दिला आहे.
यावेळी रणजीत पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देवानं तुम्हाला चांगली बुद्धी द्यावी, या करता हे गणराया तूच आता या सरकारला सद्बुद्धी दे, असे म्हणून टोला लगावला. सरकारने मराठा आरक्षणावर विचार न केल्यास आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रंजीत पाटील यांनी दिला. घंटानात आंदोलनावेळी कृष्णा चिकणे, विक्रम बापू घाईतिडक, अविनाश मोरे, ओंकार चिकणे, पांडुरंग घोलप, मनोज मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.