जालना : प्रतिनिधी
जिल्ह्यातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. भाजपचे बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, आमदार नारायण कुचे हे आज पहाटे (२० जुलै सोमवारी) छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरकडे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघाले होते. पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या दरम्यान जामखेड फाटा परिसरात ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाचा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती स्वत: आमदार कुचे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
अपघातग्रस्त वाहनात आमदार नारायण कुचे प्रवास करत नव्हते. त्या गाडीत त्यांचे सुरक्षा रक्षक, चालक आणि एक सहकारी उपस्थित होते. अपघात इतका गंभीर होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले. तिघांनाही गंभीर दुखापती झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघात घडला तेव्हा आमदार कुचे यांचे वाहन या गाडीच्या मागेच होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवले आणि मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनाच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना त्वरित जालना शहरातील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
जखमींवर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
















