मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये दादर परिसरात हा अपघात झाला आहे. सुनील शिंदे यांच्या कारला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात सुनील शिंदे बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हे प्रभादेवीला एका कार्यक्रमासाठी जात होते. ते दादर परिसरातून प्रभादेवीला जात असताना समोरून एका बेस्ट बसने त्यांच्या कारला धडक दिली. यावेळी सुनील शिंदे हे त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्येच बसले होते. अचानक समोरून सुनील शिंदेंच्या कारला बेस्टने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या फॉर्च्युनर कारच्या पुढील भागचे नुकसान झाले. त्यांच्या कारच्या बोनेटच्या हेडलाईटचे नुकसान झाले.
सुदैवाने या अपघातात सुनील शिंदे थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा बेस्ट बस अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.