मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडताना दिसतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू प्रथमच एका संयुक्त निमंत्रणपत्रिकेवर एकत्र झळकले आहेत. खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १) त्यांच्या ट्विटद्वारे यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.
गुरुवार, ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता, मुंबईच्या वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित ‘विजयी जल्लोष मेळावा’ या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे निमंत्रण दिले आहे. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रभर मराठी भाषिकांमध्ये आनंदाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केला जात आहे.
अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार
या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या नेत्यांकडून आज रात्री ९.३० वाजता एनएसासीआय डोम येथे पाहणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, राजकीय संघर्षाच्या अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आम्ही वाट बघतोय : राज-उद्धव ठाकरे
संयज राऊत यांनी शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवले का? तर हो नमवले! कोणी नमवले? तर तुम्ही- मराठी जनतेने! आम्ही केवळ तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे. आम्ही आयोजक आहोत, पण जल्लोष तुम्हालाच करायचा आहे. वाजत-गाजत, गुलाल उधळत या..आम्ही वाट बघतोय!
नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
सरकारच्या हिंदी सक्तीच्या राज्यभरातील विरोधानंतर दोन जीआर रद्द करण्यात आले. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यानंतर मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थित महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ विजयाचा जल्लोष आहे की भविष्यातील संयुक्त राजकीय समीकरणांची नांदी? याकडे आता अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.