लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्हयातील ५० आयुष्यमान आरोग्य मंदिरातून (प्राथमिक आरोग्य केंद्र) ग्रामीण भागातील नागरीकांना देण्यात येतात. या आरोग्य सेवांचे १०० गुणांचे कामाच्या नुसार मुल्यमापन करून ५० आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे दर महिण्याला रँकींग ठरवले जाणार आहे. उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मानही केला जाणार आहे. यामुळे आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये उत्तम दर्जाच्या सेवा देण्यासाठी स्पर्धा निर्माण होणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सतत नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेवून राबविण्यात येतात. आरोग्य विभागाकडून नुकतेच दर गुरुवारी जेष्ठ नागरिकांच्यासाठी विशेष तपासण्या, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, योगा घेण्याचा निर्णयाचा अनेक जेष्ठ नागरीकांना लाभ झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हयातील ५० आयुष्यमान आरोग्य मंदिरातून (प्राथमिक आरोग्य केंद्र) ग्रामीण भागातील नागरीकांना ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांचे मुल्यमापन करून जिल्हास्तरावरून रँकीग ठरवले जाणार आहे. या प्रायोगीक उपक्रमाची जानेवारी २०२४ पासून सुरूवात झाली आहे.
जिल्हयातील आयुष्यमान आरोग्य मंदिरातून दिल्या जाणा-या शासनाच्या महत्वकांक्षी योजनावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना देण्यात येणा-या सेवांमध्ये सातत्य येऊन आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. चांगले काम करणा-या आयुष्यमान आरोग्य मंदिरांची दर महिण्याला रँकींग ठरवली जाणार आहे. त्यामुळे सेवा देणा-या आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांचे मनोबल वाढणार आहे. या कामांचा तालुका आरोग्य अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील आयुष्यमान आरोग्य मंदिरांचा दर आठवडयाला नियमित आढावा घेणार आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेला गती मिळण्यास मदत होणार आहे.