बारामती : प्रतिनिधी
अलीकडच्या काळात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याचे सांगत शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही लोकांनी पक्ष काढला. तुम्ही साथ दिली. अनेक वर्षे लोक निवडून गेले. महाराष्ट्र सुधारला. हा पक्ष स्थापन कुणी केला? पक्ष काढला मी, खूण कुणाची होती? आणि एके दिवशी काही लोकांनी आमच्यावर खटला केला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षफुटीवरून बारामतीत भाष्य केले. बारामती विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी कन्हेरी येथे झालेल्या प्रचारसभेत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पक्षाचे मालक हे नाहीत, आम्हीच आहोत, ही खूण त्यांची नाही आमचीच, असा खटला आमच्यावर केला. दिल्लीच्या कोर्टात यावर सुनावणी झाली. ज्यांनी (अजित पवार) केस केली त्यांनी कोण मुख्य माणूस म्हणून मला समन्स काढले. इलेक्शन कमिशनचे समन्स आल्यानंतर हजर राहिलो. माझ्याविरोधात तक्रार कुणाची चिरंजीवांची. दोन नावे, दोन्ही पवार. माझ्या आयुष्यात असे कधी घडले नव्हते, असेही शरद पवार म्हणाले.
ती केस करून मला त्याठिकाणी खेचलं गेलं. केंद्र सरकारने काय चक्रं फिरवली माहिती नाही. कोर्टाने निर्णय दिला की, पक्ष आणि चिन्ह दुस-यांचं आहे, शरद पवारांचा काही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला नवीन चिन्ह घ्यावं लागलं. पक्ष पळवला, खूण पळवली, असे पवारांनी नमूद केले.
महाराष्ट्राने अनेकदा माझा शब्द मान्य केला. आम्हा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिली. उपमुख्यमंत्री कुणाला करायचे, असा प्रश्न माझ्यापुढे यायचा. आम्ही चर्चा करायचो. चारवेळा बारामतीचा उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचा. पाचव्यांदा यंदा पहिल्यांदा भाजपवाल्यांची मदत घेतली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांना मते दिली होती. असे असताना त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतले? असा सवाल पवारांनी केला