लातूर : प्रतिनिधी
सरकारने घटनेतील तरतूदीनूसार धनगर समाजास अनुसूचित जमातीत समाविष्ट करुन तातडीने समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी जय मल्हार सेनेच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथे सुमारे तीन तास रास्ता रोको केल्यानंतर तहसील प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) करण्यात यावा या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे यांच्या नेतृत्वात शिरुर ताजबंद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान बराच वेळ वाहने थांबुन राहिली होती. बहुतांश आंदोलनकर्त्यांनी पिवळ्या टोप्या, पिवळे झेंडे घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. अहमदपूर तहसील प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारण्यात आले. सरकारने तातडीने धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागु करावे, अन्यक दि. २० डिसेंबरपासून राज्यभर आंदोलन करण्याच इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात पांडूरंग लोहकरे, ओमप्रकाश नंदगावे, सुभाष घोडके, लिंबराज केसाळे, नारायण राजूरे, गोपाळ म्हेत्रे, अशोक महाके, शंकर शेळके, लहू कोरे, भीमाशंकर येलुरे, पापा देवकते, बळीराम भिंगोले, दयानंद बुद्धे, श्रीकृष्ण सुरवसे, संदीप येनफळे यांच्यासह जय मल्हार सेनेचे पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.