सेलू : विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता या विषयाची माहित व्हावी. बजेट, खर्च नियंत्रित करणे, कर्ज भरणे आणि इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्समध्ये रिस्क-रिवॉर्ड ट्रेड-ऑफ समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे तुमच्या जवळील पैशाचे केलेले नियोजन असे प्रतिपादन एचडीएफसी बँकेचे मॅनेजर भारत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी आर्थिक साक्षरता विषयाशी निगडीत विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक सेलू एचडीएफसी बँकेचे मॅनेजर भारत पाटील, असिस्टंट मॅनेजर रविराज जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, ममता सिंग आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने शाळेत विद्यार्थ्यांना पैशाचे नियोजन कसे करावे, कश्याप्रकारे गुंतवणूक असते, बँकाचे व्यवहार, कर्जाची पद्धत कशी असते, त्यावरील व्याज प्रणाली इत्यादी बाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच आर्थिक व्यवहाराकरिता युपीआय सारख्या आधुनिक साधनांचा वापर मोठ्याप्रमाणावर वापर होत असताना दिसत आहे.
ज्या पद्धतीने युपीआय, फोनपे वापर सोपा आहे तेवढाच तो वापर करतेवेळी काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे, असे डॉ. संजय रोडगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले. आभार प्रदर्शन अर्जुन गरुड यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.