मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘अवारापन २’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. तब्बल १९ वर्षांनंतर या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. इमरानचा जुना भावनिक आणि दमदार अंदाज पुन्हा पाहायला मिळाल्याने सोशल मीडियावर टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे.
टीझरची सुरुवात ‘माझे वेदनेशी जुने नाते आहे… ’ या संवादाने होते. त्यानंतर ‘काही लोकांच्या कथांचा शेवट त्यांना हवा तसा होत नाही… त्यांच्या कथा इतरांसाठी लिहिलेल्या असतात’ हा प्रभावी संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. प्रेम, वेदना आणि अॅक्शनचा संगम असलेला हा टीझर पहिल्या चित्रपटाच्या भावविश्वाची आठवण करून देतो.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवारापन’ चित्रपटाने इमरान हाश्मीला वेगळी ओळख मिळवून दिली होती. चित्रपटातील कथा, संगीत आणि त्याचा अभिनय आजही चाहत्यांच्या मनात ताजा आहे. त्यामुळे सिक्वेलची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.
‘अवारापन २’ मध्ये इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचीही दमदार झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे, त्या या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या लूकने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
नितीन कक्कर दिग्दर्शित ‘अवारापन २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
















