27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रआषाढीसाठी पंढरीत १२ लाख भाविक

आषाढीसाठी पंढरीत १२ लाख भाविक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

पंढरपूर : अपराजित सर्वगोड
राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा आषाढी एकादशी सोहळा आज संपन्न होत आहे. हा नयनरम्य सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी सुमारे बारा लाखाहून अधिक वारकरी भाविक संतांच्या पालख्यांसोबत हरिनामाच्या गजरात पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा सपत्नीक पार पडली.

‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज,भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद या अभंगाप्रमाणे देहभान विसरून विठ्ठला चरणी भाविक भक्त लीन झाले आहेत. मंदिर प्रथमच भाविकांना ७०० ते ८०० वर्षापूर्वी असलेले काळ््या पाषाणातील आणि कोरीव नक्षीकामात दिसत असून, पुरातन शैलीतील सावळ््या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. भूवैकुंठ पंढरीनगरीत दाखल झालेल्या भाविक भक्तांची चंद्रभागेत पवित्र स्रान करून देवाचे दर्शन घेऊन सावळ््या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. ‘भेटीलागीं जीवा लागलीसे आस’ ‘पाहे रात्रीं दिवस वाट तुझी’ अशी अवस्था भाविकांची पाहावयास मिळाली. ही आस विठ्ठल दर्शनाने संपली असल्याची भावना व्यक्त होत आहे. आषाढी एकादशीची महापूजा पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली.

आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर भक्ती सागर, स्टेशन रोड, रेल्वे स्थानक, बसस्थानक यासह पंढरपूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वारक-यांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत लाखो भाविक उभे आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे १८ ते २० तास कालावधी लागत आहेत. दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी चहापान व फराळाची सोय करण्यात आले आहे. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून स्पीकरद्वारे भाविकांना सूचना दिल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलिस प्रशासनाने मदत कक्ष उभे केले आहेत.

कडेकोट पोलिस बंदोबस्त
भाविकांच्या सुरक्षेसाठी ८ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. येणा-या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाआरोग्य शिबिर राबविण्यात येत आहे. याचबरोबर पंढरपूर बाजार समिती येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वच्छतागृहाचा वापर करण्याचे आवाहन
येणा-या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. स्वच्छतेसाठी विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करावा, अशा सूचना दिल्या जात आहेत. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जादा आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले असून स्वच्छतेचे काम सुरू आहे, असे नगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR