चेन्नई : तिलक वर्मा आणि रवि बिश्नोईच्या फलंदाजीने चेन्नईतही भारताला २ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला. अटीतटीच्या या सामन्यात एकटा तिलक वर्मा शेवटपर्यंत मैदानात उभा राहिला आणि ७२ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे विजय सुकर झाला. यासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी-२० सामना खूपच अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता कायम ठेवली. पण भारताने बाजी मारत इंग्लंडवर मात केली. भारताला अखेरच्या २ षटकांमध्ये म्हणजेच १२ चेंडूत १३ धावांची गरज होती. तिलक वर्मा आणि रवी बिश्नोई मैदानावर होते. पहिल्या २ चेंडूंवर तिलक वर्माने धाव घेतली नाही. तिस-या चेंडूवर थेट २ धावा घेत सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले. यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव घेत तिलकने बिश्नोईला स्ट्राईक दिली आणि रवीने पाचव्या चेंडूवर जबरदस्त चौकार लगावला. सहाव्या चेंडूवर बिश्नोई मोठा फटका खेळण्यासाठी खाली बसला आणि चेंडू पॅडला लागला. त्यावेळी बॉल ट्रॅकिंग करत असताना चेंडू पिचच्या बाहेर पडल्याने नाबाद दिले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना तिलक वर्मा आणि रवी बिश्नोईने पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि दुस-या चेंडूवर चौकार लगावत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.