जळगाव : प्रतिनिधी
पुण्यामध्ये रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे तनिषा भिसे या गरोदर महिलेने आपले प्राण गमावले. ही घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमधील जावळे रुग्णालयात दोन चिमुकल्यांना इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत्यू झालेल्या एका मुलाच्या पालकांनी आपल्या मुलांच्या उपचारासाठी मोलमजुरी करून पैसे जमा केले तर दुस-या मुलाच्या पालकांनी व्याजाने पैसे घेतले. मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान महागडे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील जावळे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना महागडे इंजेक्शन दिल्यानंतर दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील जावळे रुग्णालयात सेरेब्रल पाल्सी या आजारावर उपचारासाठी आलेल्या अडीच वर्षीय आणि तीन वर्षीय मुलांना इंजेक्शन देण्यात आले होते. इंजेक्शन दिल्यानंतर साधारणत: चार तासांनंतर दोन्ही बालकांना त्रास व्हायला सुरुवात झाली. यामधील एका मुलाचा १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. तर दुस-या ३ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या एका चिमुकल्याच्या पालकांनी याबाबत पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.