17.5 C
Latur
Tuesday, November 25, 2025
Homeलातूरइतिहास विभागाच्या वतीने किल्ले औसा येथे हेरिटेज वॉक

इतिहास विभागाच्या वतीने किल्ले औसा येथे हेरिटेज वॉक

लातूर : प्रतिनिधी
हेरिटेज वॉक म्हणजे आपल्या स्थानिक परिसरात असणा-या ऐतिहासिक वास्तूंना भेटी देणे व तेथील परिसराची निगा राखणे, त्या वास्तूंचे संवर्धन करणे. वास्तविक पाहता ही संकल्पना सर्वात प्रथम पाश्च्यात्य देशांमध्ये उदयास आली आहे. मात्र लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या इतिहास व एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी किल्ले औसा येथे ही आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात राबवली.
महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरातत्व संचालनालय, नांदेड विभाग व राजर्षी शाहू महाविद्यालयातील इतिहास व एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक वारसा सप्ताह तसेच एनसीसी दिवसाच्या निमित्ताने हेरिटेज वॉक या उपक्रमा अंतर्गत औसा येथील ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. इतिहास विभागप्रमुख लेफ्ट. डॉ. सौ. अर्चना टाक-जोशी यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याच्या इतिहासाची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक वारसास्थळाची स्वच्छता केली. याप्रसंगी लेफ्ट. डॉ. सौ. अर्चना टाक- जोशी म्हणाल्या, बहामनी साम्राज्याचा वजीर महंमद गवान याच्या कार्यकाळात या किल्ल्याची निर्मिती झाली. नंतर बहामनी साम्राज्याचे पाच राज्यात विभाजन झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. त्यानंतर बरीदशाही, पुन्हा आदिलशाही, निजामशाही, मोगल, इंग्रज व नंतर हैदराबादचा निजाम अशा विविध राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
मध्ययुगीन काळात या किल्ल्यामध्ये सरकारी कार्यालये होती. एकंदरीत या किल्ल्याला राजकीय इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला आहे.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, पुरातत्व कार्यालय, नांदेड विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, डॉ. कामाजी डक, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे यांनी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकूण ३७ विद्यार्थी व प्राध्यापकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. डॉ. राहुल मोरे, डॉ. प्रियदर्शनी पाटील, किशोर मगर, श्रद्धा निकम, अक्षय कांबळे यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR