हिजबुल्लाहच्या तळांवर जोरदार हवाई हल्ले
तेल अवीव : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध संपून अवघे चार दिवस उलटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबवला. त्यानंतर इस्रायलने लगेचच लेबनॉनवर हल्ला केला. दक्षिण लेबनॉनच्या डोंगराळ भागांवर इस्रायलने मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली. हिजबुल्लाहच्या मालमत्तांना लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले केले. इराणसोबतचा संघर्ष थांबताच इस्रायलने हे हल्ले सुरू केले.
नाबातियेहच्या डोंगरांवर दोनदा हवाई हल्ले करण्यात आले. यासाठी बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. या हल्ल्यातील जीवितहानीबद्दल अद्याप कोणताही तपशील समोर आलेला नाही. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली शस्त्रसंधी १४ महिने चालली. यानंतर इस्रायल दररोज दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ले करत आहे. आज इस्रायलने हे हल्ले अधिक तीव्र केले.
इस्रायली सैन्याच्या लढाऊ विमानांनी हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले चढवले. एका महत्त्वाच्या भूमिगत प्रकल्पाचा भाग असलेल्या परिसरावर इस्रायलने हल्ले केले. हिजबुल्लाहच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ले करण्यात आले. दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागांमध्ये टेहळणी करणारे ड्रोनदेखील दिसून आले. या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली.
हिजबुल्लाहच्या कारवाया
रोखण्यासाठी हल्ल्याचा दावा
हिजबुल्लाहच्या कारवाया रोखण्यासाठी हवाई हल्ला केल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. दक्षिण लेबनॉनच्या नबातियाह अल-फौका आणि इकलीम अल-तुफ्फाहच्या डोंगरांवरील अनेक भागांना लक्ष्य करण्यात आले. हिजबुल्लाहचे तळ, मालमत्ता, पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले.