23.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeराष्ट्रीयईव्हीएममधून कोणताही डेटा डिलीट करू नका

ईव्हीएममधून कोणताही डेटा डिलीट करू नका

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) मध्ये असलेली संरक्षित निवडणूक माहिती सध्या तरी नष्ट करू नका आणि त्यात कोणताही डेटा रिलोड करू नका, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. ईव्हीएम पडताळणी संदर्भात एक धोरण तयार करण्याची मागणी करणा-या याचिकांवर आज सुनावणी झाली. ईव्हीएमची मेमरी/मायक्रो कंट्रोलरची तपासणी आणि पडताळणीसाठी दिशानिर्देश जारी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. यावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून ईव्हीएमच्या पडताळणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ईव्हीएमशी छेडछाड व्हावी असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटते की, कदाचित अभियंते सांगू शकतील की छेडछाड झालेली आहे की नाही. आपण याला योग्य पद्धतीने सांगितलेले नाही, ही आमची अडचण आहे, असे न्यायालयाने म्हटले. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीनसाठी मानक संचालन प्रक्रिया नेमकी काय आहे, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारला.

निवडणूक आयोगाला आता ईव्हीएम मेमरी आणि मायक्रोकंडक्टर नष्ट करण्याच्या प्रक्रियेची माहिती द्यावी लागेल. ईव्हीएममधील मतांची मोजणी संपल्यानंतर यंत्रांमधील डेटा नष्ट केला जाऊ नये, अशी मागणी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने याचिकेतून केली होती. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना आमची भूमिका विरोधाची नाही. जर पराभूत उमेदवाराला स्पष्टीकरण हवे असेल तर अभियंता स्पष्टीकरण देऊ शकतो, असे न्यायमूर्ती म्हणाले.

ईव्हीएमची पडताळणी
करण्याची होती मागणी
ईव्हीएममधील जाळण्यात आलेली मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर अभियंत्याकडून पडताळून घेतला जावा, ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नसल्याचे त्याच्याकडून तपासून घेण्यात यावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली होती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, हरियाणा काँग्रेसचे नेते करण सिंह दलाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR