18.2 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रईव्हीएम नेले त्याच बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

ईव्हीएम नेले त्याच बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या बसमधून ईव्हीएम नेण्यात आले होते, त्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ८६ हजार रुपये सापडले. ते पाहून प्रवाशांसह चालक आणि वाहकाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचे देखील कौतुक होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, मतदानासाठी ज्या बसमधून ईव्हीएम नेण्यात आले त्या बसच्या सीटखाली गुरुवारी सायंकाळी ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल विद्यार्थ्यांना दिसून आले. सदर विद्यार्थ्यांनी ८६ हजारांची ही रक्कम एसटी बसच्या वाहक सविता अडांगळे यांच्याकडे सुपुर्द केली.

प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये मतदानाच्या दुस-या दिवशीच मोठी रक्कम मिळून आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ही रक्कम नेमकी कोणाची असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोपरगाव आगाराची एमएच ४० ५६७९ या क्रमांकाची बस स्ट्राँग रूमपासून ईव्हीएम आणि कर्मचा-यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली.

साईराज कदम नावाच्या विद्यार्थ्याने तसेच त्याच्या सहका-यांनी हे बंडल बसमधील संजीवनी इंग्लिश मीडियमचे कर्मचारी रोहित होन आणि सचिन भालके यांच्याकडे दिली. त्यांनी ते नोटांचे बंडल महिला वाहक सविता अडांगळे यांच्याकडे दिले. त्यानंतर सविता अडांगळे यांनी बस डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनाही याबाबत माहिती देऊन ती रक्कम बस डेपोत नेऊन जमा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR