नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर पूर्वेत आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना आलेला पुर आणि भूस्खलनांच्या घटनांनी हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक कोपानंतर अनेक नागरिकांना युद्धपातळीवर मदत पोहचवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पीएम मोदी यांनी आसाम-सिक्कीम आणि मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, नागालॅँड येथील नागरिकांना आश्वस्त करीत मदत पोहचविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.आसाम-सिक्कीम आणि मणिपूर या तिन्ही राज्यातील जनतेला धीर धरण्यास सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
पूर्वोत्तर राज्यातील पुराने मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता वाढून ४० झाली आहे. यात आसामात १६, अरुणाचल प्रदेशात ९, मेघालय आणि मिझोरममध्ये अनुक्रमे ६, ३ सिक्किममध्ये ३, त्रिपुरात २ आणि नागालँडमध्ये १.
आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन राज्यांमध्ये दोन दिवसांत २६ हून अधिक मृत्यू झाले अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात भूस्खलनात एक कार खोल दरीत कोसळली. अपघातात दोन कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. मिझोरमच्या सेरछिपमध्ये १३ घरे कोसळली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच वेळी, उत्तर सिक्कीममध्ये सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आसाम आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री अनुक्रमे हिमंत बिस्वा सरमा आणि प्रेम सिंह तमांग, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
आसाममध्ये २० जिल्ह्यांना फटका
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनाने आतापर्यंत १६ लोक ठार झाले आहेत. २० हून अधिक जिल्ह्यात ५.३५ लाखाहून अधिक लोक पुराने त्रस्त आहेत. पुरस्थिती सोमवारी आणखीच चिंताजनक बनली असून ७८ हजारहून अधिक लोक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत. १२०० हून अधिक लोकांना ५ वेगवेगळ्या मदत शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे. लखीमपूर जिल्हा सर्वात जास्त पूरग्रस्त आहे, जिथे ४१,६०० हून अधिक लोक संकटात आहेत.
भूस्खलनामुळे ९ सैनिक बेपत्ता
सिक्कीममधील आर्मी कॅम्पमध्ये झालेल्या भूस्खलनात काही सैनिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. नऊ सैनिक देखील बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील आर्मी कॅम्पमध्ये भूस्खलन झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले.