धाराशिवला एक टीएमसी पाणी देण्यास मोहोळमधील शिंदेसेनेच्या नेत्याचा विरोध
मच्छिंद्र कदम
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, पाणीटंचाईची समस्याही गंभीर होणार आहे. हे लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उजनी धरणातून एक टीएमसी पाणी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली, मात्र, मोहोळमधील (जि. सोलापूर) शिंदे सेनेच्या एका नेत्याने धाराशिवला पाणी देण्यासाठी विरोध केला. याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांना शनिवारी (दि. १०) प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना खासदार ओमराजे हे नात्याने चुलतबंधू असलेल्या राणाजगजितसिंह पाटलांच्या मदतीला धावून आले. पाण्याच्या बाबतीत कुणी आडवे आले तर जुमानणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय, कौटुंबिक वैर सर्वश्रूत आहे. काही महिन्यांपूर्वी ओमराजे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पाटील कुटुंबीयांशी जुळवून घेणार का, असा प्रश्न ओमराजेंना अनेकवेळा विचारण्यात आला. आपल्या भूमिकेत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, पाटील कुटुंबीयांना माझा विरोध कायम राहील, असे ओमराजे यांनी अनेकदा स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ओमराजेंचे शनिवारचे वक्तव्य चर्चेत आले आहे. धाराशिवला पाणी मिळावे, अशी न्याय्य भूमिका घेत असताना ओमराजे एका अर्थाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र दिसले. राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे हे दोघेही सध्या सत्ताधारी एनडीएत आहेत.
दुष्काळात पाणीटंचाईवर मात करता यावी, यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांनी दुष्काळ पाहणी दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे उजनी धरणातून एक टीएमसी पाणी देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आणि सोलापूरच्या जिल्हाधिका-यांना तसे आदेश दिले. तुळजापूर येथील रामदरा तलावात हे पाणी साठवण्यात येणार आहे. तेथून गरज भासेल तसे टँकरद्वारे जिल्हाभरात या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र, मोहोळ भागातील शिंदेसेनेच्या एका नेत्याने धाराशिवला पाणी देण्यास विरोध सुरू केला. त्या नेत्याने शेतक-यांसह सोलापूरच्या जिल्हाधिका-यांची भेट घेऊन आमची गरज भागल्याशिवाय धाराशिवला पाणी नेऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली. या महिन्यातच हे पाणी रामदरा तलावात येणे अपेक्षित आहे. त्यात खोडा पडतो की काय, अशी शंका निर्माण झालेली असताना ओमराजेंनीही घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
नेमके काय म्हणाले ओमराजे?
उजनी धरणातील पाणी धाराशिवला देण्यास पश्चिम महाराष्ट्रातील काही नेतेमंडळींंकडून विरोध केला जात आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर ओमराजे म्हणाले, की आपण उंचीवर आहेत. आपले क्षेत्र हे दोन खो-यांवर येते. आज याठिकाणी उंचावर पडणारे हे पाणी आहे. हे आपल्या हक्काचे आहे आणि तेच आपण मागतोय. आपण म्हणत नाही की, त्यांच्याकडे पडलेले पाणी आपण मागतोय. त्यामुळे अशा पद्धतीचा विरोध करत असताना प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही या विरोधाला मग कोणही असेल तरी जुमानणार नाही.
















