शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या हिसामाबाद ( उजेड जि.लातूर)येथील गांधीबाबा यात्रेला दि.२३ जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे. पाच दिवस चालणा-या या यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून यासाठी यात्रा कमिटीसह ग्रामपंचायत व ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
गेल्या ६६ वर्षापासून अविरतपणे गांधीबाबाच्या नावाने भरणारी ही यात्रा भरणार आहे. दि. २३ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी शेतकरी मार्गदर्शन शिबीर व प्रगत शेतक-यांंचा सत्कार, दि.२४ जानेवारी बुधवारी सकाळी महिला मार्गदर्शन-चिकित्सा व उजेडच्या सासुबाई व सुनबाई यांचा सत्कार दि.२५ जानेवारी गुरूवारी सायंकाळी बालाजी सुळ व राहुल भालेराव यांचा कॉमेडी शो, दि. २६ जानेवारी शुक्रवारी प्रभातफेरी व सांस्कृतिक कार्यक्रम,दि. २७ जानेवारी शनिवारी सकाळी गायन स्पर्धा व दुपारी जंगी कुस्त्याचे आयोजन केले असून माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते कुस्त्यांचे शुभारंभ होणार आहे.
दि.३० जानेवारी सायंकाळी युथ आयकॉन विधी पळसापुरे यांचे महात्मा गांधी यांच्या जीवनावर व्याख्यान होणार असून याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या विविध कार्यक्रमामुळे ही यात्रा आबालवृद्धांसाठी पर्वणी ठरणार असून परिसरातील नागरिकांना यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच सौ. नंदिनी अनंत जाधव व यात्रा कमिटीचे संयोजक शकील रसुलसाब देशमुख यांनी केले आहे.