पोंगयांग : वृत्तसंस्था
उत्तर कोरियाचा हुकुमशहा ऑलिम्पिक वीरांना दिलेल्या शिक्षेवरून चर्चेत असताना आता एकाचवेळी ३० अधिका-यांना फाशीची शिक्षा दिल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. उत्तर कोरियामध्ये महापूर आला होता. या पुराच्या पाण्यात हजारो लोक मारले गेल्याने किम जोंग उन भडकला आहे. यामुळे त्याने या अधिका-यांना थेट फासावरच लटकविण्याचा निर्णय घेतला.
उत्तर कोरियामध्ये अतीवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. पुराच्या पाण्यात ४००० लोकांचा मृत्यू झाला. या लोकांना वाचविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारी अधिका-यांना किमने भयानक शिक्षा दिली आहे. ही शिक्षा देताना भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिका-यांची निवड करण्यात आली आहे. ज्या अधिका-यांवर भ्रष्टाचाराचे खटले दाखल होते त्यांना किमने फासावर लटकविण्याचा निर्णय घेतला.
भीषण पुरामुळे चागांग प्रांतातील काही भाग उद्ध्वस्त झाला. यामध्ये ४,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हुकूमशहा किमने या पुरग्रस्त भागाचा दौरा केला होता. तेव्हा तो अधिका-यांचे नियोजन पाहून भडकला होता. ज्या अधिका-यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले त्यांना जबाबदार धरत तात्काळ फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ऑगस्ट मध्येच या अधिका-यांना एकाच वेळी फाशी देण्यात आली. जुलै महिन्यात चागांग प्रांतात हा पूर आला होता. यात १५,००० हून अधिक लोक बेघर झाले होते. फाशी देण्यात आलेल्या अधिका-यांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. किमने तेव्हा पक्षाच्या काही नेत्यांनाही बडतर्फ केले होते. यात २०१९ पासून चांगांग प्रांताच्या प्रांतीय पक्ष समितीचे सचिव कांग बोंग-हून होते.