नांदेड : प्रतिनिधी
उदगीर-रावी-देगलूर या तीन राज्यांना जोडणा-या राष्ट्रीय महामार्गासाठी ८१० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
उदगीर-रावी-देगलूर हा राष्ट्रीय महामार्ग तयार व्हावा यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मागणी सुरू होती. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे उदगीर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता या ठिकाणी त्यांची भेट घेऊन माजी तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या रस्त्याच्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जनतेशी संवाद साधताना या रस्ते विकासासाठी आपण निधी उपलब्ध करून घेऊ असा विश्वास चिखलीकर यांनी दिला होता.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी जनतेची कामे हातून न सोडता जनसेवा ही आपला वसा समजून चिखलीकर यांनी उदगीर – रावी – देगलूर या राष्ट्रीय महामागार्साठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. या कामात त्यांना उदगीरचे युवा नेते अमोल पाटील कवळखेडकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. चिखलीकर यांनी सततचा पाठपुरावा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून तब्बल ८१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता उदगीर – रावी – देगलूर या राष्ट्रीय महामार्गार्मुळे तीन राज्यांचा संपर्क वाढणार असून कृषी क्षेत्रालाही मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
दळणवळणांच्या साधनात वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी विकासासाठी आता नवी संधी निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उदगीर – रावी – देगलूर या राष्ट्रीय महामार्गासाठी ८१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे आणि हा निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे या भागातील नागरिकांनी आभार मानले.