20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeसंपादकीयउदारमतवादी कॉम्रेड !

उदारमतवादी कॉम्रेड !

सध्याच्या राजकीय क्षेत्रात बौद्धिक उंची व खोली असणा-या नेत्यांची अत्यंत उणीव भासत असताना ज्यांनी आयुष्यभर राजकारणात आपल्या बौद्धिक उंची व खोलीचा पदोपदी प्रत्यय घडवला त्या कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे जाणे कुठल्याही सुबुद्धास शोकाकुल करून टाकणारेच आहे. येचुरी यांचे जाणे ‘एक नेता गेला’ एवढ्यापुरते मर्यादित नक्कीच नाही कारण जिथे हल्ली आपल्या प्रदेशावर तर सोडाच पण विभागावर प्रभाव निर्माण करण्यात अयशस्वी ठरत असलेल्या स्वयंघोषित नेत्यांचीच भाऊगर्दी पहायला मिळते तिथे देशभर आपला प्रभाव निर्माण करणारे व तो अनेक विपरीत परिस्थितीतही टिकवून ठेवणारे नेते दुर्मिळच! सीताराम येचुरी हे देशातले असेच दुर्मिळ नेते. डावे असोत की उजवे विचारधारेचे कडवे समर्थन करणा-यांना उदारमतवादी नकोच असतात. अशा उदारमतवाद्यांवर त्यांच्याच पक्षातील सहकारी सर्वांत जास्त तुटून पडतात. मात्र, तरीही काळाची गरज लक्षात घेऊन, लवचिक धोरण स्वीकारत मुख्य ध्येयाच्या प्राप्तीसाठी समान विचार बिंदूंना एकत्र करण्याचे उदारमतवादी राजकारण करण्यासाठीच विचारांची पक्की बैठक तर लागतेच पण मनाचा मोकळेपणाही लागतो.

सीताराम येचुरी यांच्यात हे गुण ठासून भरलेले होते आणि म्हणूनच ते इतरांपेक्षा खूप वेगळे नेते ठरले. जन्म तेलगू ब्राह्मण कुटुंबात आणि शिक्षण तामिळनाडूमध्ये, शालान्त परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकाविण्याची बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण दिल्लीत, कार्यक्षेत्र पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा, इंग्रजीबरोबरच मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, बंगाली आदी विविध भाषांवरही अतिशय उत्तम प्रभुत्व आणि या सगळ्या भाषांमधले अत्यंत सहज पण अमोघ वक्तृत्व, त्याला प्रचंड व्यासंग, अभ्यासाची अप्रतिम जोड आणि सोबत तेवढाच विचारांचा मोकळेपणा एवढे सगळे गुण एका व्यक्तीत आढळणे दुर्मिळच! सीताराम येचुरी यांच्यात हे सगळे गुण होते आणि म्हणूनच देशातल्याच नव्हे तर जगातल्या दुर्मिळ नेत्यांमध्ये त्यांची गणना झाली. सप्टेंबर १९७७ मधील घटना. देशातील आणीबाणी हटून लोकसभा निवडणूक झाली आणि निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी पदसिद्ध असलेले नेहरू विद्यापीठाचे ‘कुलपती’ पद सोडले नव्हते. विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीचा नेता असलेला एक तरुण या मुद्यावरून थेट इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी धडकला. आंदोलकाच्या आग्रहामुळे इंदिरा गांधी यांना घराबाहेर यावे लागले. त्या तरुण नेत्याने आपल्या मागण्यांचे निवेदन इंदिरा गांधी यांना ठामपणे वाचून दाखविले. या मागण्यांमध्ये इंदिरा गांधी यांनी पदसिद्धतेतून मिळालेले कुलपतीपद सोडावे या मागणीचाही समावेश होता.

सुरुवातीला इंदिराजींनी या मागणीकडे लक्ष दिले नाही. मात्र, काही दिवसांत त्यांनी हे पद सोडले. हे सगळे घडवून आणणारा तो विद्यार्थी नेता होता सीताराम येचुरी! सीताराम येचुरी यांनी विद्यार्थी नेता म्हणून स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेचा देशभर प्रसार करून मोठे संघटन उभे केले. तेथून ते माकपमध्ये आले आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले. स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी जन्मलेल्या येचुरी यांनी भारताच्या राजकारणातील अनेक मोठी स्थित्यंतरे नुसती पाहिलीच नाहीत तर अनुभवली. त्यात भूमिका घेताना या उदारमतवादी नेत्याने प्रसंगी पक्षाचा विरोध पत्करूनही वैचारिक लवचिकता स्वीकारली. मात्र, हे करताना ते आपल्या मूळ विचारांवरून व तत्त्वांवरून अजिबात ढळले नाहीत. येचुरी मोकळ्या मनाचे व उदारमतवादी नेते होते. त्यामुळे ते ग्रंथजीवी ठरले नाहीत. त्यांनी अन्य विचारधाराही समजून घेतल्या, त्यांचा अभ्यास केला व स्वत:ची वैचारिक बैठक पक्की केली. म्हणूनच डावे असूनही ते नक्षलवादी चळवळीपासून कायम चार हात दूर राहिले. केवळ मार्क्सवादाची पारायणे न करता त्यांनी देशातील वर्गविग्रहात त्याचा संदर्भ व अर्थ शोधण्याचा कायम प्रयत्न केला.

त्यामुळेच त्यांची राजकीय भूमिका कायम वेगळी ठरली. डाव्यांचे राजकारण हे त्यावेळी काँग्रेसला विरोध हेच होते. त्यासाठी डाव्यांनी भाजपशी सख्य करण्याची वैचारिक बदफैलीगिरीही केली. मात्र, खरे आव्हान जातीयवादी व धर्मवादी शक्तींशी मुकाबला करण्याचे आहे याचे भान डाव्यांमधील एका गटाला आले व त्या गटात सीताराम येचुरी अग्रस्थानी होते. त्यातूनच नरसिंह राव यांच्या पराभवानंतर एच. डी. देवेगौडा, इंदरकुमार गुजराल यांचे सरकार आणण्यासाठी येचुरी यांनी वैचारिक लवचिकता दाखवून आघाड्या स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २००४ साली वाजपेयी सरकारचा पाडाव करून सत्तेवर आलेल्या मनमोहन सिंग सरकारला डाव्या पक्षांनी पाठिंबा देण्यासाठी येचुरी यांनी यशस्वी प्रयत्न केले. ज्योती बसू यांना आलेली पंतप्रधानपदाची संधी पक्षातील कर्मठ नेत्यांच्या हट्टाने हुकल्यावर ‘ही ऐतिहासिक घोडचूक होती’ हे मोकळेपणाने मान्य करण्याचे मनाचे मोकळेपण सीताराम येचुरी यांच्या ठायी होते.

येचुरी २००५ ते २०१७ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. ‘आमची लोकशाही प्राचीन आहे’, असा दावा करणा-या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना ‘१९६५ पर्यंत तुमच्या देशात प्रत्येकाला मताधिकार नव्हता. भारतात स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक स्त्री-पुरुषाला हा मताधिकार आहे. त्यामुळे भारताची लोकशाही हीच प्राचीन लोकशाही आहे’, असे सुनावणारे नेते सीताराम येचुरी होते. संसदेतील त्यांची भाषणे ही राजकीय व सामाजिक विषयांच्या अभ्यासकांसाठी वस्तुपाठ ठरावीत! वैचारिक मोकळेपण व सहिष्णुता हे डाव्यांमध्ये अपवादानेही न आढळणारे गुण सीताराम येचुरी यांच्या ठायी होते. त्यामुळे येचुरी पक्षीय भिंती ओलांडून सर्व पक्षांशी संबंध निर्माण करू शकले. डाव्यांसाठी अस्पृश्यच असलेल्या भाजपशी संबंध निर्माण करणारे येचुरी एकमेव अपवादच! धर्मनिरपेक्षतेवर अढळ श्रद्धा ठेवूनच त्यांनी आयुष्यभर राजकीय भूमिका घेतल्या. त्यासाठी वैचारिक लवचिकताही दाखविली. भल्या मोठ्या राजकीय प्रवासात नेत्यांच्या तात्त्विक व वैचारिक निष्ठांमध्ये बदल होत गेलेले आपल्या देशाने वारंवार पाहिले व अनुभवले आहे.

मात्र, येचुरी याला अपवाद ठरले! समान ध्येयापोटी त्यांनी राजकारणात वैचारिक लवचिकता व उदारमतवाद अंगिकारला तरी स्वत:च्या साम्यवादी विचारसरणी व तत्त्वापासून ते अजिबात ढळले नाहीत. विचारसरणीची राजकीय पीछेहाट होत असताना ते ठामपणे लढत राहिले व विचारांची मशाल पेटवत राहिले. व्यासंग, वक्तृत्व, वैचारिक निष्ठा, सहिष्णुता, उदारमतवाद अशा गुणांनी संपन्न असणारा नेता जाणे हे त्यांच्या पक्षापेक्षाही देशातल्या सामान्यजनांसाठी जास्त नुकसानकारक आहे. येचुरी यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी म्हणूनच भरून निघणे अशक्य आहे. अशा या उदारमतवादी, सहिष्णु व चतुरस्र नेत्यास एकमत परिवाराचा अखेरचा ‘लाल सलाम’!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR