लातूर : प्रतिनिधी
राज्यघटनेवरील विविध प्रभाव, संविधान सभा व घटना समितीच्या माध्यमातून भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा असून ती भारताच्या सर्वोच्च आदर्शांकडे निर्देश करते. संविधानाच्या उद्देशपत्रिकेत भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले असून न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे.
दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिनाच्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड होते. यावेळी उपप्राचार्या डॉ. अंजली जोशी, डॉ. सुधीर गाडवे, डॉ. संतोष पाटील, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. सुभाष कदम उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क व कर्तव्यांप्रती आदर आणि निष्ठेची गरज अधोरेखित करत डॉ. गाडवे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना दिली आणि ती देशाने स्वीकारली. २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना लागू झाली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांमधील महत्त्वाच्या बाबी अभ्यासून भारतीय राज्यघटनेत त्यांचा समावेश केला. राज्यघटनेचे अंतरंग उलगडताना डॉ. गाडवे यांनी संघराज्य, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, संविधानातील नागरिकांचे हक्क व समानतेची तत्त्वे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुभाष कदम यांनी उद्देशपत्रिकेचे वाचन उपस्थितांकडून करुन घेतले. यावेळी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

