मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्या राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केले आहे. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमी चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येतील का? शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे दोन्ही पक्षांच्या समर्थकांना वाटते. दोन्ही बंधू राजकारणात एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय रचला जाऊ शकतो.
नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकते अशी नेहमी चर्चा होत असते. पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यापेक्षा लांब राहणे जास्त पसंत केलेलं बघायला मिळालं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या बाजूने अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा इतिहास आहे.
विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे हे एकमेकांना जोरदार टीका करताना बघायला मिळाले. मात्र कौटुंबिक सोहळ्याला ठाकरे बंधूंची उपस्थिती बघायला मिळाली. माहीममधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात होते. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार दिला होता. यावरुन मनसेकडून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही ठाकरे भावांमध्ये या वितुष्ट आल्याचं बघायला मिळालं होतं.