मुंबई : प्रतिनिधी
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी नियमित चेकअपसाठी मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सर्व वैद्यकीय चाचणी, तपासणी व्यवस्थित पार पडल्यानंतर मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंना एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबाबत सोशल माध्यमातून माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्यावर सर्वायकल स्पाईनबाबत शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, आता नियमित चेकअपसाठी त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच हार्ट ब्लॉकेजशी संबंधित आणि हृदयाशी संबंधित इतर अन्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु आता उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक असून, मंगळवारी रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात रेग्युलर तपासणीसाठी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे ते आता ठीक आहेत… आणि ते कामावर परतण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे सज्ज आहेत, असे आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.