लातूर : प्रतिनिधी
खरेदीदाराने शेतमाल घेतल्यानंतर लागलीच पैसे अदा करावेत, अशी मागणी आडत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे नियमाप्रमाणे १० दिवसांनंतरच आडत्यांना पैसे देण्याच्या निर्णयावर खरेदीदार ठाम असल्याने गेल्या १ जुलैपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. मात्र दि. १६ जुलै रोजी खरेदीदार व आडते यांच्यातील वाद अखेर मिटला असून उद्या दि. १८ जुलैपासून आडत बाजारातील सर्व व्यवहार पुर्ववत सुरु होणार असल्याची माहिती सभापती जगदीश बावणे यांनी दिली.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार हे पारदर्शक असल्यामुळे या बाजार समितीचा नावलौकी कर्नाटक व आंध्रप्रदेशापर्यंत आहे. बाजार समितीत दररोज किमान १० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असते. परंतु, आडते व खरेदीदार यांच्या वादामूळे गेल्या १७ दिवसांपासून आडत बाजार बंद राहिला. त्यामुळे पावणे दोनशे कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे व्यवहार ठप्प राहिले. आडते आणि खरेदीदार हे दोन्ही घटक आपापल्या निर्णयावर ठाम राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव यांनी ब-याच वेळा आडते व खरेदीदार यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. समन्वय राखून दोन्ही घटकांनी आपापली भुमिका पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले होते. परंतू, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. तब्बल १७ दिवस आडत बाजार बंद राहिला.
आडते व खरेदीदार यांच्यातील वाद मिटत नाही, हे लक्षात येताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे २४ तासांत सौद्यात सहभागी व्हावे, अशा नोटीसा खरेदीदारांना बजावल्या. परंतु, २४ तास उलटूनही त्याचाही परिणाम झाला नाही. आडत बाजार बंदच राहिला. शेवटी दि. १६ जूलै रोजी सभापती जगदीश बावणे यांनी आडते व खरेदीदारांमधील वाद मिटवला असून उद्या दि. १८ जुलैपासून आडत बाजार पुर्ववत सुरु होईल.