सोलापूर : सोलापूर हे उद्योगाचं पूर्वीपासून केंद्र आहे. कापड गिरण्या आणि सूत व्यवसाय व वस्त्र उद्योग यासाठी सोलापूर प्रसिद्ध होतं आणि आहे.
पण याला वेगळा आयाम देत स्व कलगोंडा पाटील आणि जयकुमार पाटील यांनी यांत्रिक उद्योगास प्राधान्य दिलं. त्यामुळेच लक्ष्मी उद्योग समूह, प्रिसिजन, क्रॉस इंटरनॅशनल यासह अनेक मोठे उद्योग सोलापुरात उदयास आले. चिंचोली एमआयडीसी चे जनक जयकुमार पाटील यांनीच ही किमया घडवून आणली कारण ही एमआयडीसी उभं करण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली आहे.
स्वतःच्या व्यवसायासोबतच इतर व्यवसाय देखील सोलापुरात जोमाने सुरू व्हावेत हा व्यापक विचार जयकुमार पाटील यांनी नेहमीच जपला उद्योगात ग्राहक केंद्रबिंदू मानून उत्पादन आणि विक्री झाली पाहिजे हा त्यांचा मापदंड होता. त्यामुळे सोलापूरचे उद्योगशिल्प म्हणजे जयकुमार पाटील असे समीकरण निर्माण झाले आहे. उद्योगशिल्प जयकुमार पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात डॉ.रावसाहेब पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रारंभी. प्रा. सविता वैद्य यांनी प्रास्ताविकात चर्चासत्र आयोजनाचा हेतू सांगितला.
या उपक्रमामागील यशवंतराव चव्हाण सेंटरची भूमिका दत्ता गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितले. प्रारंभी प्रिन्सिपल के पी मंगळवेढेकर तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि उद्योग शिल्प जयकुमार पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थी तसेच प्रा. स्नेहल पाठक, प्रा. टिंकेश ग्यामलानी सरफराज शेख दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.