32.3 C
Latur
Monday, March 16, 2026
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नावे पिवळे रेशन कार्ड

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नावे पिवळे रेशन कार्ड

बनावट रेशन कार्ड रॅकेटचा शोध सुरू

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे पिवळे रेशन कार्ड बनवण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे तयार करून, शासकीय योजना लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप केले होते. या बनावट रेशन कार्डमधील तपशील, त्यामधील माहिती पाहिली असता मूळ रेशनकार्डाप्रमाणेच ते तयार करण्यात आल्याचे समोर आले.

अशी रेशनकार्ड बनतात कुठे? आणि ती कोण बनवून देते? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे रेशनकार्ड कोणत्याही शासकीय कार्यालयातून तयार करण्यात आले नसून ते बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने बनावट रेशनकार्ड बनवणा-या टोळक्याचा शोध घेण्याची मागणी जलील यांच्याकडून करण्यात येत आहे.

या पिवळ्या रेशनकार्डमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे , सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे रेशनकार्ड हस्तलिखित स्वरुपातील असून, गेल्या दोन वर्षांपासून वापरले जात आहे. आता याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी फिर्याद केली आहे. हा प्रकार १२ मार्चला उघडकीस आला असून अजून हे रॅकेट कुठेकुठे सक्रिय आहे आणि राज्यात अशी किती रेशनकार्ड बनावट आहेत याचा शोध घेण्यात येत आहे.