छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
उसणे पैसे दिलेल्या ५० लाखांसाठी तगादा लावणा-या निवृत्त प्राध्यापकाची त्यांच्याच मित्राने गोळी घालून हत्या केली. विशेष म्हणजे खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटासारखा बनाव रचल्याचे समोर आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. मृत निवृत्त प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
विशाल राठोड आणि आकाश पवार हे त्यांचे चांगले मित्र होते. या दोघांनी प्रा. लोंढे यांच्याकडून मोठी रक्कम घेतली होती. हे पैसे परत घेण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. परंतु हे पैसे परत देणे शक्य नसल्याने त्यांनी हत्या करण्याचा कट रचला आणि पूर्वनियोजित कटानुसार दौलताबाद परिसरातून दारू पार्टी करून तेथून परतत असताना लोंढे यांच्या परवानाधारक पिस्तुलातून आरोपींनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर एका खड्ड्यात पुरले. याबाबत बनाव करण्यात आला. परंतु अखेर पोलिसांनी बिंग फोडत विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली.
















