९ जणांविरुद्ध गुन्हा, १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज जप्त
औसा : प्रतिनिधी
औसा शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मटका जुगार राजरोसपणे चालू असताना याकडे स्थानिक प्रशासन फारसे लक्ष देत नव्हते. मात्र आज दि. १३ जून २०२६ रोजी नांदेड विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने औशातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून मटका जुगार असे साहित्य व रोख असे १ लाख ६२ हजार रुपयांचे साहित्य जप्त करून जुगार खेळणारे व खेळविणा-या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शहरातील एका तथाकथित प्रसाद सम्राट समाजसेवकाचा समावेश आहे.
याबाबतची माहिती अशी की, औसा शहर व परिसरात कालन गल्ली येथे आरोपींनी आपल्या फायद्यासाठी ऑनलाइन स्किल गेम व मिलन डे नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम १ लाख ६२ हजार ९६० रुपये मिळून आले. याबाबतची तक्रार येथील पोलिस हवालदार बाबू येनकुरे यांनी दिल्यावरून औसा पोलिस ठाण्यात तेजस संतोष कांबळे (रा. धनगर गल्ली औसा), ज्ञानेश्वर देविदास कांबळे (रा. धनगर गल्ली औसा), विनोद सुरेश चिंचोलकर (रा. कोळेवाडी), रावसाहेब राघू चिंचोलकर, संदीप रावसाहेब चिंचोलकर (रा. कोळेवाडी, ता. औसा), मल्लिकार्जुन लिंबाजी कोरे पाटील (रा. भोई गल्ली औसा), आकाश शिवशंकर कुरसुळे (रा. हाश्मी चौक औसा), अबुझर अतिक शेख अमन अतिक शेख (रा. कालन गल्ली) या ९ जणाविरुद्ध मटका जुगार कायदा कलम १२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास बाबू येनकुरे हे करीत आहेत.
















