देश मोठ्या आर्थिक संकटात, काँग्रेसच्या चर्चासत्रात यशवंत सिन्हा आणि अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली भीती
मुंबई : प्रतिनिधी
देशात वाजपेयी सरकार असतानाही विरोधकांचा सन्मान केला जात होता. संसदेत कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही. पण सध्या विरोधकांना संपवण्याचे काम होत आहे. सुडाच्या राजकारणामुळे सर्वच क्षेत्रात देशाची अधोगती होत आहे. देशापुढे भयंकर आर्थिक संकट उभे आहे. या संकटातून मोदी सरकार देशाला बाहेर काढू शकत नाही, ‘मोदी मस्ट गो’, असे परखड मत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज मांडले.
प्रदेश काँग्रेसने ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अरुणकुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशापुढे उभ्या असलेल्या आर्थिक संकटाचे गांभीर्य निदर्शनास आणले.
मोदी सरकार विकास दराचे जे आकडे मांडून श्रेय घेत आहे, ते आकडेच मुळात चुकीचे आहेत. भारताचा विकास दर ७.७ टक्के आहे हे ते सांगत आहेत. पण सत्य वेगळे आहे. या आकड्यावर अनेक अर्थतज्ज्ञ शंका उपस्थित करतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या आकड्यांवर शंका उपस्थित करून भारताला ‘सी’ ग्रेडमध्ये टाकले आहे. विशेष म्हणजे ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांचाही नंबर ‘ए’ ग्रेड मध्ये आहे.
२०४७ साल येता येता भारत विकसित देश होईल, असे मोदी सांगत आहेत. पण त्यासाठी आपला विकासाचा दर हा ८ टक्क्यांच्या वर असला पाहिजे आणि सध्याचे आकडे पाहता ते उद्दिष्ट गाठता येणे फारच कठीण आहे. भारतासमोर हे संकट इराण युद्धामुळे आलेले नाही. सरकार डिझेलचे रेशनिंग करत आहे. रुपया कुठे चालला आहे? महागाई प्रचंड वाढली आहे आणि स्टॉक मार्केटची अवस्थाही गंभीर आहे. मागील २ वर्षांत ३.२५ लाख कोटी रुपये देशातून बाहेर गेले आहेत. शेतकरी संकटात आहे. खतांची टंचाई आहे. ग्रामीण भागातील अवस्था अत्यंत बिकट बनत चालली होईल. शेतकरी संकटात येईल व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसेल, असा इशारा यशवंत सिन्हा यांनी दिला.
भारताने याआधी अनेक मोठ्या संकटाचा सामना केला आहे आणि त्यातून देश पुन्हा ताकदीने उभा राहिला. पंडित जवाहलाल नेहरु ते अटलबिहारी वाजपेयीपर्यंत सर्वच सरकारांनी संकटाचा मुकाबला केला. पण सध्याच्या मोदी सरकारमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची इच्छाशक्तीच नाही. खोटे बोलून काम चालवले जात आहे, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देश आज मूठभर लोकांच्या हाती गेला आहे. देशातील आजची परिस्थिती पाहता रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
१२ वर्षांत गुंतवणूक
जीडीपीच्या ३२ टक्केच
गुंतवणूक वाढली तरच विकास दर वाढेल पण मागील १२ वर्षांत गुंतवणूक ही जीडीपीच्या ३२ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यात वाढ झालेली नाही, त्याच्या आधारे विकास दर ६ ते ६.५ टक्के होतो. सरकारने मांडलेले आकडे साफ चुकीचे आहेत, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणाले.
अमेरिकेसमोर
झुकले सरकार
आज भारत सरकार अमेरिकेसमोर झुकले आहे, ते सांगतील तसेच केले जात आहे. पंतप्रधान अमेरिकेसमोर नतमस्तक आहेत आणि त्याचाही मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. अमेरिका-इराण वादात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मग आपले विश्वगुरु कुठे आहेत, असा प्रश्नही यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला.
चुकीचे आकडे
सांगून दिशाभूल!
अर्थतज्ज्ञ प्रा. अरूणकुमार यांनी मोदी सरकार जीडीपीचे आकडे लपवत असल्याचा आरोप केला. देशातील असंघटित क्षेत्र खूप मोठे आहे. छोटे, अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या मोठी आहे. नोटबंदीचा मोठा फटका लघू उद्योग क्षेत्राला बसला. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला. त्याचा फटकाही असंघटीत क्षेत्राला बसला. गरिब माणूस पिचला जात आहे. सर्व क्षेत्रात पिछेहाट होत आहे. तंत्रज्ञानात आपण मागे आहोत. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपली गुंतवणूक अमेरिका, चीनच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, असे म्हटले.
















