न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अलीकडच्या काळात जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर केला जात आहे. नुकतेच न्यायालयात एका संशयित आरोपीने स्वत:ची बाजू मांडण्यासाठी चक्क ‘एआय’ वकिल उभा केला.
या ‘एआय’ वकिलामुळे कोर्टात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. न्यायमूर्तीही संतप्त झाले. काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. अगदी आरोपीला खुलासाही द्यावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात हा प्रकार घडला आहे. ७४ वर्षीय जेरोम डिवाल्ड यांनी त्यांच्या विरोधात गेलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपिल केले होते. त्यांनी वकिल न देता स्वत:च खटला लढविण्याचा निर्णय घेतला. स्वत:चे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी चक्क ‘एआय’ वकिल उभा केला.
त्यांच्या युक्तिवादाला समर्थन देण्यासाठी त्यांनी एक पूर्वीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ न्यायालयात सादर केला. ‘एआय’ वकिलाच्या माध्यमातून जेव्हा जेरोम यांनी आपली बाजू मांडली तेव्हा न्यायमूर्तींचे पॅनल गोंधळात पडले. त्यावर न्यायमूर्ती सॅली मॅन्झानेट-डॅनियल्स म्हणाल्या, अपिल करणा-याने युक्तिवादासाठी व्हिडिओ सादर केला आहे. ठीक आहे. आपण तो व्हिडिओ ऐकूया.
जेव्हा व्हिडिओ सुरू झाला, तेव्हा त्यात एका निळ्या कॉलरचा शर्ट आणि बेज स्वेटरमध्ये असलेला डिवाल्ड यांच्यापेक्षा तरुण दिसणारा पुरुष दिसून आला. न्यायमूर्ती काही क्षणांसाठी गोंधळले आणि त्यांनी विचारले की, हा व्यक्ती तुमचा वकील आहे का? डिवाल्ड यांनी सांगितले की, हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (‘एआय’) साहाय्याने तयार केलेला डिजिटल अवतार आहे. तो खरा माणूस नाही, मीच तो ‘एआय’ अवतार तयार केला आहे.
त्यांचे उत्तर ऐकून न्यायमूर्ती मॅन्झानेट-डॅनियल्स संतप्त झाल्या आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर डिवाल्ड यांनी न्यायालयाला पत्र लिहून माफी मागितली. माफीनाम्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझा हेतू कुणाची फसवणूक करण्याचा नव्हता, तर माझी बाजू शक्य तितक्या प्रभावीपणे मांडण्याचा होता. कुणालाही त्रास द्यायचा नव्हता. मला वकील मिळाला नव्हता, त्यामुळे स्वत:लाच कायदेशीर युक्तिवाद मांडावा लागला. मी बोलतो तेव्हा ब-याचदा अस्पष्ट बोलतो, बोलताना शब्द चुकतात किंवा मी गोंधळून जातो. म्हणून एआयचा वापर केला.