भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव झंजाळ या गावातील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. जिथे एका बँकेच्या एटीएममध्ये एक मोठा विषारी साप सापडला असून या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहमीप्रमाणे बँकेचा कर्मचारी एटीएममध्ये कॅश लोड करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने मशिन ओपन करताच एक भला मोठा, काळसर रंगाचा साप त्याच्या नजरेस पडला. सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही की एटीएममध्ये असा साप असू शकतो, पण काही क्षणांतच साप हालचाल करू लागल्याने त्याची भीती वाढली.
सदर प्रकार लक्षात येताच बँकेच्या कर्मचा-यांनी कोणतीही रिस्क न घेता तातडीने गावातील स्थानिक सर्पमित्राला संपर्क केला. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचला आणि संपूर्ण खबरदारी घेत एटीएम मशिन उघडण्यात आली. सर्पमित्राने अत्यंत काळजीपूर्वक त्या सापाला मशिनमधून बाहेर काढले.