लोणी-काळभोर : प्रतिनिधी
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च येथील विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य दिनानिमित्त सेंट तेरेसा स्कूल, लोणी-काळभोर येथे ‘मानसिक आरोग्याची संवेदनशीलता’ या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले.
शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणारा मानसिक ताण, पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचा अतिरिक्त तणाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवरील उपाय तसेच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी पालक व शिक्षक यांची भूमिका या विषयांवर या पथनाट्यातून महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारे व्यायाम व प्राणायाम आदींची माहितीही या सादरीकरणातून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे उपस्थित चिमुकल्यांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
सेंट तेरेसा स्कूलचे मुख्याध्यापक विनय सुकुल आणि उपमुख्याध्यापिका सॅलविना सुकुल यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य लाभले. तसेच शाळेचा शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे सर्व प्राध्यापक व छात्र-अध्यापक यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड आणि कुलगुरू डॉ. राजेश एस. यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि अधिष्ठाता डॉ. प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. डॉ. नीता म्हवाण यांनी कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून काम पाहिले.