माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप
धुळे : प्रतिनिधी
धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर असलेल्या विधीमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना ५ कोटींचे वाटप करण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. गोटे यांनी धुळे विश्रामगृहाच्या ज्या खोलीत पैसे ठेवले, त्याला कुलूप लावले. पोलिस अधिकारी तेथे आले त्यांनी पैशाची मोजणीदेखील केली. १ कोटी ८४ लाख रुपये खोलीत ठेवल्याचे आढळले. ही खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावावर बूक होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली. यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी माझा चौकशी समितीवर विश्वास नसल्याचे सांगत ही केवळ धूळफेक असल्याचे म्हटले आहे.
माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की, एसआयटी म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी आहे. यापूर्वीदेखील मंत्री जयकुमार रावल यांच्या रावल बँक संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली. अब्दुल करीम तेलगी प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली. मग तपास सीबीआयकडे का देण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एसआयटी, अँटी करप्शन, धुळे पोलिस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही, अशी प्रतिक्रियाही अनिल गोटे यांनी दिली. खरीच चौकशी करायचे असेल तर प्रवीण गेडाम, तुकाराम मुंडे यांच्यासह माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची कमिटी स्थापन करावी, असे म्हटले.
नियुक्ती फेटाळूनही
पाटील खोतकरांसोबत
विधिमंडळातील दोन्ही सभापतींनी नियुक्ती फेटाळूनही किशोर पाटील अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्यासोबत काम करत असल्याचे समोर आले आहे. याची विधिमंडळाकडून लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. विधिमंडळातील सदस्यांची लवकरच एक समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.