नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ९ ठिकाणी हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. परंतु, यामध्ये सर्वांत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावली ती, एस-४०० सुदर्शन चक्राने.
पाकिस्तानचा हल्ला रोखण्यासाठी भारताने एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली भारताला मिळण्यासाठी तत्कालीन माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी दाखवलेली दूरदृष्टी आत्ता भारतीय सैन्यासाठी अतूट शक्ती ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. यानंतर पाकने भारतावर हल्ले सुरू केले. यावेळी भारताची अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे सक्रिय राहिली. ही एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय लष्कर आणि वायू दलासाठी एक मजबूत सुरक्षा कवच ठरत आहे. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानकडून हवेत सोडण्यात आलेले अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट केली. भारताकडे असलेली एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली ४०० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहे.
एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा करण्यात आलेला करार भारतासाठी आता वरदान ठरत आहे. कारण ही प्रणाली भारतीय वायू दलासाठी अभेद्य ताकद ठरत आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात याचा करार करण्यात आला होता. शेकडो आत्मघाती ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमाने पाडण्यात भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या एस-४०० ची मोठी भूमिका राहिली आहे. ही डील झालीच नसती तर आज भारताचे प्रचंड नुकसान झाले असते.