छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (९ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व मतदारसंघाचे भाजपा उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘सुन लो ओवेसी, हे छत्रपती संभाजीनगर आहे, औरंगाबाद नाही’, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील पहिल्यांदाच भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सावे यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून पहिली जाहीर सभा देवेंद्र फडणवीस यांनी सिडको भागात घेतली. यावेळी त्यांनी थेट असदुद्दीन ओवेसींना थेट इशारा दिला. सुन लो ओवेसी, हे छत्रपती संभाजीनगर आहे. याचे नाव आता कोणीही बदलू शकत नाही.. असे सांगत हे शहर कालही भगवे होते, आजही आहे आणि उद्याही भगवेच राहणार, असे फडणवीस म्हणाले.
तसेच लोकसभा निवडणुकीत सहा जागांवर व्होट जिहादचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या विधानाचा संदर्भ देत जर ते वोट जिहाद करणार असतील तर आम्हालाही मतांचे धर्मयुद्ध करावेच लागेल, असे फडणवीसांनी ठणकावून सांगितले.