छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
शहरातील औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. येथून दोन्ही सेना आणि वंचितने उमेदवार आधीच जाहीर केला होता. आज येथून एमआयएमने महापालिकेतील माजी गट नेते नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी दिली.
विशेष म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात नासेर सिद्दिकी यांनी दुस-या क्रमांकाची तब्बल ३५.४ टक्के मते घेतली होती. यामुळे आता मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसारख्या नवख्या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील याच मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला होता. तब्बल १० वर्षांनंतर या मतदारसंघात पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. आता शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल मैदानात आहेत. उद्धवसेनेकडून पुन्हा किशनचंद तनवाणी, तसेच एमआयएमकडून २०१९ चे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनाच मैदानात उतरविण्यात आले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने अगोदरच जावेद कुरैशी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथील राजकीय लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१९ मध्ये नासेर सिद्दिकी दुस-या क्रमांकावर
२०१९ च्या विधानसभेच्या राजकीय आखाड्यात वंचित मुळे मोठा उलटफेर दिसला. या मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हे ४२.६ टक्के मते घेत विजयी झाले. मात्र, दोन क्रमांकावर ‘एमआयएम’चे नासेर सिद्दीकी होते. त्यांनी तब्बल ३५.४ टक्के मते घेतली होती. वंचितचे उमेदवार अमित भुईगळ यांनी तिस-या क्रमांकाची १४.१ टक्के मते घेतली.