औसा : प्रतिनिधी
औसा शहरातील येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका गुरूवार दि. ३१ जुलै रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास जळून खाक झाली आहे. ही आग वाहनात स्पार्किंग झाल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली. सध्या औसा ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे सद्यस्थिती जुन्या इमारतीचा बहूतांश भाग पाडण्यात आला आहे त्यामुळे रुग्णवाहिकेस पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही.
ग्रामीण रुग्णालय औसा आणि न्यायालय या दोन्हींच्या मध्ये असलेल्या रस्त्यावर सदरील रुग्णवाहिका या उभ्या असतात. गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अॅम्बुलन्सच्या वायरिंगमध्ये काहीतरी स्पार्किंग झाली आहे आणि त्यामुळे वाहनास आग लागली. दरम्यान औसा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागास सदरील आगीची माहिती दिली असता उशिराने अग्निशान दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. घटनास्थळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील उपस्थित होत्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औसा पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.