नांदेड : प्रतिनिधी
राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्ज माफीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात अनेक शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचा गंभीर आरोप करत नांदेड तालुक्यातील वडगाव येथील शेतक-यांनी मंगळवारी २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. शासनाने केलेल्या घोषणेनुसार २ लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतक-यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील कर्जमाफीची पहिली यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये सुमारे ४० शेतक-यांची नावे समाविष्ट आहेत. यादीत नाव आल्यानंतर संबंधित शेतकरी बँकेत केवायसी प्रक्रियेसाठी गेले असता, त्यांना अपेक्षेप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी झालेली नसल्याचे निदर्शनास आले.शेतक-यांचे म्हणणे आहे की, अनेकांनी १ लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते.
व्याजासह त्यांची थकबाकी दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र बँकेकडून केवळ मुद्दलातील काही रक्कमच माफ करण्यात आली असून, उर्वरित रक्कम तसेच व्याज भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे शासनाच्या घोषणेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची भावना शेतक-यांमध्ये आहे. याबाबत राज्य शासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतक-यांनी निवेदनातून केली.
















