बेंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकचे भाजप नेते जी. देवराज गौडा यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा भाजपचे देवराज गौडा यांनी केला आहे.
देवराज गौडा यांना नुकतीच एका लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली होती. शनिवारी देवेगौडा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती, त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना देवेगौडा यांनी हा दावा केला आहे.
एआयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर एका पोलिस वाहनात माध्यमांशी संवाद साधताना देवराज गौडा यांनी दावा केला की, शिवकुमार यांनी त्यांना बंगळुरूमधील ११० क्रमांकाच्या खोलीत अॅडव्हान्स म्हणून ५ कोटी रुपये पाठवले होते.
मी ही ऑफर नाकारल्याचे देवराज गौडा यांनी सांगितले. सुटकेनंतर मी त्यांचा (डीके शिवकुमार) पर्दाफाश करेन. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पडणार आहे. डीके शिवकुमार यांना पंतप्रधान मोदींची प्रतिमा डागाळायची आहे, असा दावा भाजप नेत्याने केला.
देवराज गौडा म्हणाले, ‘‘कुमारस्वामी यांनी लैंगिक छळाशी संबंधित व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह प्रसारित केले, असे विधान करण्यास मला सांगण्यात आले होते.
देवराज गौडा यांनी पुढे दावा केला की, चन्नरायपटना येथील स्थानिक नेते गोपालस्वामी यांना हे डिल करण्यासाठी माझ्याकडे पाठवण्यात आले होते. देवराजे गौडा म्हणाले, शिवकुमार यांचा मुख्य उद्देश कुमारस्वामींना राजकीयदृष्ट्या संपवणे आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा मी त्यांच्या योजनांचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला अत्याचाराच्या प्रकरणात गोवले, परंतु नंतर कोणताही पुरावा सापडला नाही. माझ्यावरील लैंगिक छळाचा खटलाही अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी माझ्यावर नवा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला.