22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाकसोटीत सर्वाधिक सामने गमावण्यात इंग्लंड अव्वल

कसोटीत सर्वाधिक सामने गमावण्यात इंग्लंड अव्वल

नवी दिल्ली : एकदिवसीय, टी-२० पैकी कसोटी फॉरमॅटमध्ये यजमान संघाला परिस्थितीचा सर्वांत जास्त फायदा होतो, असे बोलले जाते. मात्र, अलीकडेच बांगलादेशने पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-० असा व्हाईट वॉश देऊन हा गैरसमज दूर केला आहे. मायदेशात पराभव झाल्यामुळे पाक संघावर जोरदार टीका होत आहे.

कसोटी हा क्रिकेटचा सर्वांत जुना फॉरमॅट असून, २०१९-२१ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
पाकचा पराभव करून बांगलादेशचा संघ १९ सप्टेंबरपासून २ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौ-यावर येणार आहे. दरम्यान, मायदेशात कसोटीमध्ये पाकचाच नाही तर अनेक देशांचा पराभव झाला असून, सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर कोणता संघ येतो हे पाहूया.

कसोटीत सर्वाधिक सामने गमावणारे ५ संघ

१ इंग्लंड – मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणा-या संघांमध्ये इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये संघर्ष करावा लागतो, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. घरच्या मैदानावर इंग्लंडला एकूण १२९ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

२ ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियन संघाबाबत बोलले जाते की, त्यांना पराभव या शब्दाचा व्देष आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला घरच्या मैदानावर पराभूत करणे फार अवघड आहे. मात्र, भारतीय संघाने अलिकडेच ऑस्ट्रेलियाला दोन वेळा घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियन संघ घरच्या मैदानावर एकूण १०२ कसोटी सामने हारला आहे.

३ दक्षिण आफ्रिका – जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणा-या दक्षिण आफ्रिकेने मायदेशात एकूण ७७ कसोटी सामने गमावले आहेत. यासह मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणा-या संघांच्या यादीत तो तिस-या स्थानावर आहे.

४ वेस्ट इंडिज – ८० आणि ९० च्या दशकात क्रिकेटवर राज्य करणा-या वेस्ट इंडिज संघाचा अलिकडचे कसोटी रेकॉर्ड काही खास नाही. घरच्या मैदानावर कॅरेबियन संघ आतापर्यंत एकूण ७० सामने हरला आहे.

५ न्यूझिलंड – न्यूझिलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०१९-२१ फायनलमध्ये भारताचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझिलंडचा आतापर्यंत घरच्या मैदानावर एकूण ६९ कसोटी सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR