पाथरी : पाथरी नगर परिषदेतील विविध विकास कामांमध्ये झालेल्या निधी अपहाराच्या प्रकणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या पाथरी काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणीनुसार सर्व कागदपत्रे आणि अभिलेखे चौकशी समितीचे अध्यक्ष तथा पाथरीच्या तहसीलदारांना तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या विरोधात दि. २८ सप्टेंबर पासून नगर परिषद कार्यालयासमोर पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार नगर परिषदेतील विकास कामांच्या चौकशीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने दि. १० सप्टेंबर रोजीच पत्र देऊन १५वा वित्त आयोग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, रस्ता अनुदान, तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि रमाई आवास योजनेसह विविध ७ मुद्द्यांशी संबंधित कागदपत्रे व बँक स्टेटमेंट २५ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्याधिका-यांना दिले होते. परंतू, चौकशी समितीचे पत्र आपल्याला मिळालेच नाही असे सांगत मुख्याधिकारी या प्रकरणात टाळाटाळ करत असल्याचा व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
चौकशीसाठी आवश्यक असणारे हे सर्व अभिलेखे (कागदपत्रे) अद्यापही समितीला सुपूर्द करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शकता राहून सत्य बाहेर यावे यासाठी काँग्रेसचे सभागृह गटनेता तथा नगरसेवक अन्सारी मोहम्मद इब्राहीम यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. दरम्यान, या विरोधात दि. २८ सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
















