सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोलापूर दौ-यादरम्यान माध्यमांशी संवाद साधत राज्यातील भीषण वास्तव मांडले. शेतातील उभी पिके पूर्णपणे करपून गेली असून दुष्काळी परिस्थिती अत्यंत विदारक झाली आहे. अशा संकटाच्या काळात सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून संकटात सापडलेल्या बळिराजाच्या बांधावर जाऊन त्याला धीर आणि तातडीची मदत दिली पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
राज्यातील सुमारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असताना शासन पातळीवर निर्णय घेण्यास झालेला विलंब अनाकलनीय असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘हा निर्णय खूप आधीच व्हायला हवा होता. उशिरा का होईना दुष्काळ जाहीर झाला आहे, आता सरकारने जाहीर केलेले दुष्काळी पॅकेज कागदावर न राहता तळागाळातील प्रत्येक शेतक-याच्या खात्यात जमा झाले पाहिजे. मदतीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
पीक विमा आणि नुकसानभरपाई अद्याप रखडलेली
आदित्य ठाकरे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात मदत थेट शेतक-यांच्या बांधावर पोहोचत असे. मात्र, सध्या सुपर एल निनोचे संकट आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीची झळ बसूनही शेतक-यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. गेल्या दोन-तीन वर्षांचा पीक विमाही अद्याप अनेक शेतक-यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने आम्ही काय केले आणि तुम्ही काय केले हे वाद आता थांबवून मदत वाटपात पारदर्शकता आणावी.
निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांची आठवण करून देत आदित्य ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. ‘कृषी पंपांना पूर्णपणे मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले गेले होते, मग आता अचानक ‘साडेसात एचपीपर्यंत’ अशी अट कशी काय घालण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच दुष्काळाची भीषणता लक्षात घेता शेतक-यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क राज्य सरकारने पूर्णपणे माफ करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
















